
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- पालम ते लोहा या राष्ट्रीय मार्गावर पेठशिवणी गावानजीक डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणी च्या समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार व जीपची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघाताची घटना दिनांक २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पेठशिवणी येथील नागरिक व प्रवाशी यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली आहे.
पेठशिवणी नजीकच्या रस्त्यावर जीप (क्रमांक एम एच २२ एएम ७३३३) व कार (क्रमांक एमएच ०४ ई टी २७३४) ही दोन्ही वाहने रस्त्याने जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटून एकमेकांना समोरासमोर धडक दिली आहे. या अपघातात दोन्ही वाहनाच्या समोरील बाजू चक्काचूर झाल्या आहेत. आतील तीन प्रवाशी जागेवरच ठार झाले असून ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी धाव घेत पालम शहरातील रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमीना नांदेड व पालम येथे पाठवले आहे. मयत झालेल्या प्रवाशाची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
कारचालक हा समोरच्या वाहनाला ओवरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या क्रुझर जीपवर जाऊन आदळला आहे. यात कारमधील तीन जण जागेवरच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर जीपमधील ३ जणांना जबर मार लागला आहे कारचा या अपघातात चेंदामेंदा झाल्याने आतील मृतदेह काढणे मुश्किल झाले असून कारची मोडतोड करून मयताचे पार्थिव बाहेर काढण्यात आले कार मधील मयत पुणे येथील असल्याची माहिती मिळाली आहे.