
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर कमिटीच्या व अ.भा.किसान सभेच्या जिल्हा कमिटीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करूनही मागण्याची सोडवणूक झाली नसल्यामुळे दि. २० डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.सारखणी ता.किनवट येथील कुळधारकाचे वारस श्री सिताराम कुडमेते डोणीकर यांच्या वडिलांना कुळ वहिवाट कायद्याअंतर्गत मिळालेली तीस एकर जमीन त्यांना पोलीस संरक्षणात ताब्यात द्यावी व मुळ गौंड आदिवासींची जमीन हडपणा-यावर कठोर कारवाई करावी या मागणीसह खालील नऊ मागण्यासाठी बेमुद्दत आंदोलन सुरू आहे.
खालील मागण्या सातत्याने विविध आंदोलनात केल्या असून पूर्तता झाली नसल्यामुळे पुन्हा लावून धरण्यात आल्या आहेत.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड कार्यालया समोरील अवैद्य अतिक्रमण काढण्यात यावे तसेच दि.३१ मे २०२१ पासून आरटीओ नांदेड च्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीतील मागण्या सोडविण्यात याव्यात व तेथील दलाल पध्दती बंद करण्यात यावी. वशिलेबाजीने पोलीस संरक्षण व अग्नीशस्त्र परवाने घेऊन त्याचा दुरूपयोग करून पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्यांचे पोलीस संरक्षण व परवाने काढून घेण्यात यावेत व आजवर झालेला सरकारी खर्च संबंधिता कडून वसूल करण्यात यावा आणि ज्यांच्या जिवाला खरोखरच धोका आहे अशांनाच पोलीस संरक्षण व आग्निशस्त्र परवाने द्यावेत.नांदेड शहरातील व जिल्ह्यातील सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वशिलेबाजीने पदोन्नती घेऊन सात वर्षापेक्षा अधिक काळापासून एकाच ठिकाणी शासकीय सेवा देणाऱ्यांवर तात्काळ बदलीची कारवाई करावी.नांदेड शहरातील प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर येथील सहशिक्षक आशा माधवराव गायकवाड व केशव रामजी धोंगडे यांना मागील तीस वर्षापासून संस्थाचालक व संचालक मंडळींनी अप्रोल न काढता सेवा करून घेतली आहे.त्यांना तीस वर्षापासूनचे वेतन देण्यात यावे व संबंधित बोगस शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी.
सर्वे नंबर ५६ बी वजीराबाद नांदेड येथील जमीन मालक सौ.अलका गुल्हाणे यांची जमीन मनपाने सिवरेज प्लँट साठी अधिगृहण केली असून तत्कालीन मनपा आयुक्त लहुराज माळी व जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी प्रकरण निकाली काढून त्यांना वीस लक्ष रूपये मावेजा विद्यमान आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी दिला आहे. त्यांचा उर्वरीत मावेजा त्यांना तात्काळ देण्यात यावा. तसेच सद्यस्थितीत त्यांच्या जमीन प्रकरणात विभागीय आयुक्तांना चुकीचा अहवाल पाठवून दिशाभूल करणारे भूसंपादन अधिकारी व इतर अधिकारी आदी संबंधितावर योग्य कारवाई करावी व या प्रकरणाची मागील आंदोलनात केलेल्या मागणी प्रमाणे सीआयडी चौकशी करून दोषी विरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
मौजे सारखणी ता.किनवट येथील गौंड आदिवासी सिताराम रामजी डोणीकर यांच्या आदिवासी कुळ जमीन प्रकरणाच्या अनुषंगाने रिट पिटीशन नं.३७८३/१९८९ मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व तहसिलदार किनवट यांच्या आदेशाची अमलबजावणी करण्यात यावी व त्यांना पोलीस संरक्षणात जमिनीचा ताबा देण्यात यावा. तसेच त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. दि.४ आगस्ट २०१८ रोजी नवापूल साईबाबा मंदिर जुना कौठा नांदेड येथील गोदावरी नदिपात्रात आनंद केंद्रे व इतर दोन शाळकरी मुलांचा अवैद्य रेति उत्खननामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.संबंधित दोषिवर सदोष मनुष्यवधासह व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत.दि.३ डिसेंबर २०२१ रोजी नांदेड बस आगारातील वाहक दिलीप वीर यांचा एसटी आंदोलनात हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला आहे.त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपये आर्थिक मदत करावी व त्यांच्या दोन्ही मुलांना एसटी मध्ये विभागीय नियंत्रकांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे नोकरी देण्यात यावी आणि दि.२६ डिसेंबर रोजी किनवट आगारातील एसटी वाहक बी.एन.सदावर्ते यांनी गळभास घेऊन आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील पन्नास लाख रूपयाची आर्थिक मदत करावी व त्यांच्या मुलांना रापम मध्ये नोकरी देण्यात यावी. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अनुषंगाने केलेल्या तक्रारी अर्जाप्रमाने कारवाई करावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने मागण्या सोडविल्या नाहीतर सदरील आंदोलन किमान तीन महिने नांदेड येथे करण्यात येईल व या पुढील आंदोलन महसूल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालया समोर करण्यात येईल असे माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.सदरील आंदोलनात माकप जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम,कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.उज्वला पडलवार,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.मगदूम पाशा,कॉ.शेख रफीक पाशा,कॉ.लता गायकवाड,कॉ.मुकेश आंबटवार,सहशिक्षिका आशा गायकवाड,मनिषा गायकवाड,कॉ.स.ना.राठोड,आदिवासी जमीन पिडीत सिताराम रामजी डोणीकर,मारोती रामजी डोणीकर,पांडुरंग शामराव कोरचे,तानुबाई नागोराव कनाके,लक्ष्मीबाई भिमराव आतराम,शारजाबाई शामराव आडे,देवराव नागो कुडमेते आदी सामील आहेत.[प्रशासनाच्या विरोधात आंदोलन असल्यामुळे व कळीचे प्रश्न असल्यामुळे पिडित आदिवासींना व इतर आंदोलकांना प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र आहे. दि.२४ डिसेंबर रोजी निवासी उप जिल्हाधिकारी मा.प्रदीप कुलकर्णी यांनी मागण्याशी संबंधित काही अधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात बोलावून घेऊन चर्चा करण्यात आली आहे परंतु आंदोलनातील कार्यकर्ते व शिष्टमंडळातील सदस्यांचे समाधान झाले नसल्यामुळे काही तोडगा निघू शकला नाही व आंदोलन सुरूच आहे.]
……………………………………..