
दैनिक चालु वार्ता
धुळे :-श्री.शि.वि.प्र.संस्थेचे भाऊसाहेब ना.स.पाटील कला व मु.फी.मु.अ.वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथे वाणिज्य विभाग व आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने “बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील रोजगाराची संधी” या विषयावरती एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेसाठी ऑनलाईन झूम ऍपचा वापर करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोहर पाटील होते.
कोरोना महामारीच्या (कोविड-१९)च्या काळात देखील महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे ऑनलाइन कार्यशाळा,वेबिनार, प्लेसमेंट कॅम्प, आदी उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना वाणिज्य विभागप्रमुख प्रा.क्रांती पाटील प्रस्तावना करून कार्यशाळेबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच लर्नर टू अर्नर कसे व्हावे, संभाषण कौशल्य, मुलाखती कौशल्य, भविष्यातील रोजगार उपयुक्त माहिती आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळेचे प्रमुख वक्ते मा.सिद्धांत अग्रवाल यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आजची वाढती स्पर्धा लक्षात घेता, रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या कौशल्यांची आवश्यकता असते, व्यक्तिमत्त्व विकास कसा साधला पाहिजे, तसेच आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बँकिंग व फायनान्स क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत, कोरोना काळात देखील ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे,व विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःहून सहभागी झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सदर कार्यशाळेला आय.क्यू.ए. सी. कोऑर्डीनेटर डॉ.एस.बी.घोडसे सर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेत १४६ पेक्षा जास्त विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील तसेच इतर विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.कल्पना पाटील यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ.सदाशिव सुर्यवंशी, प्रा.चेतन शिंदे यांनी प्रयत्न केले. कार्यशाळेत विभागातील सहकारी प्रा.वैशाली पाटील, प्रा.वीरेंद्र ठोलिया, प्रा.धीरज शेलार, प्रा.वैभव तलवारे उपस्थित होते.