
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई: नितेश राणेंनी काहीही केलेले नसून, केवळ सुडाच्या भावनेतून हे आरोप करण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे व गोट्या सावत यांचा संबंध लावून पोलीस अधिकाराचा गैरवापर करून नितेश व माजी जिल्हा अध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून गोवा ते मुंबई मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. या एकूण प्रकरणी केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणेंनी काय केले आहे? काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे. गुन्हा दाखल केला आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे. नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. अज्ञातवासात जाण्याची आम्हाला गरज नाही. ते आमदार आहेत. आम्ही अटक करणार अशा रितीने बातम्या दिल्या तर कोर्टात जावे लागेल. कोणावरही हल्ला करण्यात नितेश राणेंचे काही योगदान नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.