
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येतीच्या कारणास्तव अनुपस्थिती आहे. यावरुनही विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.रामदास आठवले म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वस्थेमुळे घरीच आराम करत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याची मागणी आठवले यांनी केली. मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? याबाबत आठवलेंना सवाल केला होता. या सवालावर आठवले यांनी हास्यास्पद विधान केलं आहे.
मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे,’ असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडेल आणि राज्यात लवकरच भाजप-सेना युतीचे सरकार येईल असे भाकीत देखील त्यांनी केलं होतं. महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच जाईल असंही आठवले यांनी काही दिवसांपुर्वी म्हटलं होतं.