
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे. भाजपा सरकारने लोकसभेत तीन वर्षात उपाध्यक्षपदाची निवडणुक घेतलेली नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेला माहित आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आवाजी मतदानाने निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले असल्याच्या प्रसार माध्यमांच्या प्रश्नावर पटोले प्रतिक्रिया देत होते. पटोले पुढे म्हणाले की, नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल.