
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या राज्यांमध्ये केरळ अव्वल तर काही महिन्यांमध्ये निवडणुका येऊ घातलेलं उत्तर प्रदेश राज्य तळाशी आहे. आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील कामांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सर्वोत्तम राज्यांच्या यादीमध्ये केरळने बाजी मारलीय.केंद्र सरकारच्या निती आयोगाने तयार केलेल्या हेल्थ इंडिक्सच्या चौथ्या अहवालामधून ही माहिती समोर आलीय. हा अहवाल तयार करताना सन २०१९-२० दरम्यानच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे.
भारत सरकारसाठी थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या निती आयोगाने तयार केलेल्या या अहवालामध्ये तामिळनाडू आणि तेलंगण ही दाक्षिणात्य राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीमधील तिन्ही अव्वल राज्य ही दक्षिण भारतामधील आहेत. तर उत्तर प्रदेश हे एकंदरित कामगिरीच्या आधारे तळाशी आहे. मात्र त्याचवेळी सन २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० च्या कालावधीमध्ये अभूतपूर्व सुधारणा करण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेशने अव्वल क्रमांक पटकावल्याचं अहवालात म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तवाहिनीने दिलंय.छोट्या राज्यांचा विचार केला असता मिझोरम हे सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य ठरलं असून अभूतपूर्व सुधारणेच्या बाबतीतही मिझोरमनेच बाजी मारलीय. तर आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वात तळाशी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरचा क्रमांक लागलाय. मात्र त्याचवेळी या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये अभूतपूर्व पद्धतीने आरोग्यसेवांमध्ये सुधारणा होत असल्याने त्यांना सुधारणांच्या बाबतीत अव्वल क्रमांक देण्यात आलाय.आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तरित्या हा अहवाल तयार केला आहे. जागतिक बँकेने हा अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सहाय्य केलं आहे.