दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतातील ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना’साठी बच्चन यांना पाठिंबा मागितला, अशी माहिती गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून ‘रस्ता सुरक्षा अभियान’ सुरु असून नागरिकांना सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी याबाबत यातून जनजागृती करण्यात येते. यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी या मोहिमेला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाठिंबा द्यावा अशी गडकरी यांची अपेक्षा होती. त्यामुळं बच्चन यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गडकरी स्वतः त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना पाठिंब्याची विनंती केली.
रस्ता सुरक्षा अभियानातून रस्त्यावर वाहन चालवताना तसेच पायी चालताना आपली आणि इतरांची सुरक्षा कशी राखायची याबाबत जनजागृती करण्यात येते. भारतात रस्ते अपघातांचं प्रमाण मोठं असून नियम न पाळल्यानं अनेकांचे बळी जातात. त्याचमुळं गडकरी यांनी आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठ्या दंडाचे नवे नियम आणले आहेत.