दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात राजकीय वारे वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला असून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री.वसंत आरडे यांनी शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
वसंत आरडे यांनी आज सकाळीच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री आरडे यांनी जिवाभावाने शिवसेना वाढवीन आणि राष्ट्रवादी मधील अनेक पदाधिकारी माझ्या संपर्कात असल्याची माहिती दिली व पुढील आमदार हा शिवसेनेचाच असेल असा निश्चय करूनच मी शिवसेनेमध्ये आलो आहे अशी ग्वाही जिल्हाप्रमुख यांच्या समोर दिली.
वसंत आरडे यांचे इंदापुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवण्यासाठी मोठं योगदान आहे . त्यांचा इंदापूर शहरासह तालुक्यात त्यांचा मोठा लोकसंपर्क आहे.
राष्ट्रवादीतील या महत्त्वाच्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने इंदापूर तालुक्यात तसेच पुणे जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटन अधिक मजबूत होणार आहे, असा विश्वास तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे, भीमराव आप्पा भोसले, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, तालुका समन्वयक अरुण पवार, उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब डोंगरे, इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी,संदीप चौधरी, विभाग प्रमुख अंकुश गलांडे, उपविभाग प्रमुख हेमंत भोसले, माथाडी संघटनेचे सरचिटणीस दूर्वास शेवाळे उपस्थित होते .