दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देशाचे मंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत?
हेच कळत नाही. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड, इकडे फोडाफोडी कर, तिकडे फोडाफोडी कर, मध्येच मुंबईत येणार शिवसेनेला जमीन दाखवा. बघाना आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आम्ही त्यांना आज आव्हान देतोय, आम्हाला जमीन बघायचीच आहे. अमित शाहाजी आम्हाला जमीन दाखवा. पण ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन पुन्हा जिंकून दाखवा. ती जमीन आमचीच आहे.
आमची मातृभूमी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही जागा तुम्ही परत घेऊ शकलेला नाहीत. चीन अरुणाचल, लडाखमध्ये घुसलं आहे. जा ना ती जमीन घेऊन दाखवा.
आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. हे कशाला पाहिजे हे गद्दार? आम्ही तुम्हाला घेऊन नाचू, मागे नाचत होतो तसे. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय मिरवणुका?
हे माझे सैनिक आहेत, हे तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील जर तुम्ही पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवलात तर. तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडे येऊन पंजे काढायचे. ही काय मर्दुमकी आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मोदी सरकार 2014 साली आलं होतं तेव्हा रुपयांचा, डॉलरचा भाव किती होता? आज किती झाला? त्यावेळेला भाजप नेत्या सुषमा स्वराज संसदेत भाषण करत होत्या की, मला टीव्ही लावायला भीती वाटते की रुपयाचा भाव आणखी किती खाली येणार आहे? आताही तेच होतंय. पण तेव्हा काय भाव होता आणि आता 80 रुपयांच्या पुढे डॉलरचा भाव गेला आहे. सुषमा स्वराज त्यावेळी म्हणाल्या होत्या, ज्या देशाचं चलन घसरतं तेव्हा रुपया नाही घसरत तर देशाची पद सुद्धा घसरते. माझ्या देशाची पद घसरते”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.