दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : राज्यातील चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला असला तरी पक्षासाठी चांगली बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर आघाडीवर आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. तर, दुसरीकडे रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिलेत.
नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीने बहुमत मिळवले आहे. 60 जागांपैकी या आघाडीने 37 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी 25 जागांवर एनडीपीपीला आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळला आहे. नागालँडमध्ये बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे.