दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
जवळगा बेटच्या शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले याप्रसंगी पश्चिम बंगाल मध्ये कलकत्ता येथे कार्यरत असलेले गावचे सुपुत्र निलेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती यावेळी त्यांचा गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा यासारख्या अप्रतिम सजावटीमुळे शाळेची इमारत खूपच सुंदर आणि बोलकी दिसत होती. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जे अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले,त्यांत प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे सहभागी झालेला आढळला. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे संमेलन सर्वांचे होते. हे स्नेहसंमेलन गीत गायन,नृत्य यांचा केवळ अविष्कार इतके मर्यादित न राहता ते विचारांचे, जाणीव जागृतीचे संमेलन बनले.’मुलगी वाचवा,मुलगी शिकवा, बालविवाह ऐवजी प्रौढ विवाह पद्धतीचा स्वीकार करा या अनुषंगाने सादर केलेली नाटिका प्रेक्षकांचे मन हेलावून टाकणारी ठरली,खरोखरच हे संमेलन अंतर्मुख करणारे होते.भावसाक्षरता,वैज्ञानिक विवेकशीलता,राष्ट्रीय एकात्मता, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता, समाजातील ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वठवावी लागणारी भूमिका या सारख्या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. याप्रसंगी कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक,शालेय समितीचे अध्यक्ष,सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य,प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.