दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार; न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा पतीचा इशारा.
देगलूर:देगलूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या मनीषा शिंदे यांचा डॉ. प्रदीप ठक्करवाड यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याची तक्रार २३ डिसेंबर रोजी मयताचे पती प्रभाकर शिंदे यांनी देगलूर पोलीस ठाण्यात दिली आहे. आठ दिवसाच्या आत दोषी डॉक्टरांविरुद्ध कार्यवाही झाली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रभाकर शिंदे रा. तळणी ता. बिलोली हल्ली मुक्काम नांदेड यांनी २३ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक देगलूर यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जानुसार त्यांची पत्नी मनीषा शिंदे यांना १६ डिसेंबर रोजी रात्री प्रसूती शस्त्रक्रियेसाठी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी कर्तव्यावर असलेले डॉ. प्रदीप मारोती ठक्करवाड यांनी शस्त्रक्रियेसाठी सर्वप्रथम १२ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतरच मनीषा शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री अंदाजे ९ वाजताच्या सुमारास मनिषा शिंदे यांना शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. शस्त्रक्रियासुरु असतानाच डॉ. ठक्करवाड यांनी बाहेरुन औषधी खरेदी करुन आणण्यास सांगितले; त्यामुळे शस्त्रक्रियेस तब्बल एक तास उशीर लागला. त्याचा विपरीत परिणाम मनिषा शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला. ‘मनीषा शिंदे यांची प्रकृती बिघडली त्यांचे पोट फुगले आहे’ असे सांगून डॉ. ठक्करवाड यांनी स्वत: मनीषा शिंदे यांना रुग्णवाहिकेत (क्र. एम. एच. १४ सी.एल. १३२३) पुढे पाठवून दिले. त्यानंतर १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेत बसून ते नांदेडला निघाले. देगलूर- नांदेड रोडवरील मारतळा पाटीच्या अलीकडे असलेल्या हातनी पाटीजवळ रुग्णवाहिकेला गाठून डॉ. ठक्करवाड यांनी पेशंटला रक्त चढविण्यासाठी लावलेली रक्ताची पिशवी काढून फेकून दिली. १९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता देगलूर येथून नांदेडला निघाल्यानंतर साडेदहा वाजता डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पेशंटला नेण्यात आले. तेथे पेशंटला अपघात विभागात दाखल करण्यात आले. नातेवाईकांना वार्ड क्रमांक १९ मध्ये थांबवून डॉ. ठक्करवाड हे पेशंटअसलेल्या मनिषा शिंदे यांना घेऊन स्वतः दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांनी नातेवाईकाकडे येऊन ‘पेशंटच्या पोटात पाणी व रक्त जमलेले आहे पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे’ असे सांगितले. अशाच परिस्थितीत २० डिसेंबर रोजी रात्री अंदाजे पावणेदहा वाजताच्या सुमारास मनीषा शिंदे यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णासोबत असलेला प्रभाकर शिंदे यांचा मेव्हूना स्वप्निल बकरे व मावस भाऊ उत्तम दिपके यांच्यावर दबाव टाकून पोस्टमार्टम करण्यात आले. डॉ. प्रदीप मारोती ठक्करवाड यांनी केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. १०८ रुग्णवाहिके मधील डॉ. गुजे यांना बाजूला सारुन डॉ. ठक्करवाड रुग्णवाहिकेमध्ये कसे गेले? डॉ. वलांडे यांनी त्यांना कशी वैद्यकीय परवानगी दिली ? याची चौकशी करुन डॉ. ठक्करवाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा व त्यांना सहकार्य केले म्हणून डॉ. शिवशंकर वलांडे व डॉ. गुजे यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.