दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर पोलिसांना मुखेडातील दोन मोटर सायकल चोरटे नुकतेच हाती लागले असतानाच शहरात पुन्हा भुरटे चोरटे सक्रिय होऊन पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण केले आहे. घराला कुलूप लावलेले असले की ते घर त्या दिवशी फोडलेच समजा असा शिरस्ता चोरट्यांनी टाकला असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील भक्तापूर रोड हा सध्या तेलंगणाला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असून नॅशनल हायवेवर टोलनाका सक्रिय झाल्याने भक्तापूर रोड मार्गे तेलंगणात जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील नव्या वसाहतीमध्ये बाहेरील राज्यातील नागरिकांची ही वर्दळ वाढलेली आहे. या गोंधळाचा फायदा भुरटे चोरटे घेत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील भक्तापूर रोडवरील सद्गुरुनगर मध्ये तीन घरांचे कुलूप फोडून चोरट्यांनी काही वस्तू लंपास केल्याचे समजते. सद्गुरुनगर मधील मोतेवार गुरुजी व त्यांचे भाडेकरू बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांचे मध्यरात्री कुलूप फोडून घरात प्रवेश केला. ते सध्या बाहेरगावी गेले असल्याने घरातील काय काय वस्तू गेल्या याचा तपशील मात्र हाती आला नाही . शिळवणीचे रहिवाशी भूताळे यांच्या घरालाही कुलूप दिसल्याने चोरट्यानी त्यांचेही घर फोडले. तर सेवानिवृत्त शिक्षक मोखेडे गुरुजी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील कपाट फोडून कपडे व इतर वस्तू इतरत्र फेकल्या गेले. यासाठी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.