दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.11 शिरुर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये नुकतीच आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा संपन्न झाली. खरीप हंगाम अनुषंगाने पंचायत समिती व कृषी विभागाने नियोजन सादर केले. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी, ग्रामसेवक तलाठी व कृषी सहायक उपस्थित होते. शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी अजित देसाई तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्यासह व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आमदार ॲड अशोक पवार उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी खरीप हंगाम नियोजनाबाबत सादरीकरण केले. तसेच उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी यांच्या अडचणी आमदार ॲड अशोक पवार यांनी समजून घेतल्या. कृषी विभागाने खरीप हंगाम २०२१ मध्ये पिक स्पर्धा आयोजन केले होते. त्यामध्ये बाजरी, मुग, ज्वारी, गहू, हरभरा पिकाची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात निर्वी गावचे जयसिंग सोनवणे यांनी बाजरी पिकाचे उच्चांकी उत्पादन घेत विभागात प्रथम, तर मोहनराव सोनवणे यांनी तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. तसेच मूक पिकात पुणे जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक शिरूर तालुक्याला मिळाला. करडे येथील भाऊसाहेब पळसकर यांनी प्रथम, तर गुणात येथील संभाजी भगत यांनी द्वितीय आणि अविनाश लंगे यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार पवार यांच्या हस्ते तालुक्यातील स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.