दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की,कोलवीमाल हे गाव अक्कलकुवा या तालुक्याच्या ठिकाणापासून घ्या १३ किमी अंतरावर आहे. मात्र, सदर गावाच्या पोलीस ठाण्याचा समावेश गावापासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या मोलगी परिक्षेत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना कायदेविषयक कामकाजाकरिता मोलगी गाठावे लागते.
त्यात नागरिकांची गैरसोय होतेच शिवाय वेळ, श्रम व पैसा या तिन्ही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी सदर गावाचा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात समावेश करावा. जेणेकरून जनसामान्यांना सोयीचे होईल, अश्या मागणीचे निवेदन ॲड. रुपसिंग वसावे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाल या गावाचा पोलीस ठाण्याचा कारभार मोलगी पोलीस ठाण्यात असून तो अक्कलकुवा येथे वर्ग करण्याची आवश्यकता व गरज का आहे? हे निदर्शनास आणून दिले आहे. कोलवीमाल हे गाव अक्कलकुवाहून फक्त १३ कि.मी. अंतरावर असून
मोलगी हे पोलीस ठाणे कोलवीमालहुन ७० ते ८० कि.मी. अंतरावर आहे. शिवाय कोलवीमाल येथील काही वस्तीपाड्यांमध्ये अद्यापही रस्त्याची सुविधा नसल्याने एखाद्या गावात काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मोलगी पोलीस ठाणे हे गावाहून मोठ्या अंतरावर असल्याने पोलीस प्रशासनास वेळेवर माहिती देता येऊ शकत नाही.
मोलगी हे गावदेखील दुर्गम भागात असल्याकारणाने व बऱ्याच वेळा रेंजचा प्रश्न निर्माण झाल्याने फोनवरदेखील पोलीस ठाण्यात संपर्क होऊ शकत नाही. मोलगी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी अक्कलकुवा व्हाया मोलगीला तक्रार अथवा खबर देण्यासाठी लोकांना वेळेवर वाहन उपलब्ध न झाल्यास तक्रारदार व इतर लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
विशेषतः गावात एखाद्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास पोलीस ठाण्यात अपघ मृत्यू नोंद करुन मयत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठीदेखिल मोलगी ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. दुर्गम भागातील मोलगी येथे जाण्यासाठी डोंगराळ व घाट वळणाचा रस्ता असल्यामुळे एखादी खबर द्यायची झालीच तर पूर्ण दिवस हा येण्याजाण्यातच जात असतो.
गावात कोणत्याही कंपनीचे टॉवर नसल्याने कोणतीही माहिती तात्काळ मोलगी पोलीस ठाण्यात पोहचविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. याउलट कोलवीमालपासून अक्कलकुवा जवळ असल्याने गावातील लोकांना कुठल्याही प्रकारच्या तक्रारी देण्यासाठी अक्कलकुवा पोलीस स्टेशन हे सोयीचे होईल. त्यामुळे लोकांचे होणारे आर्थिक नुकसानदेखील टळेल व गावात कोणत्याही प्रकारचे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास एका तासाच्या आत अक्कलकुव्याला कुठलीही तक्रार गावकरी देऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.
या अनुषंगाने कोलवीमाल ते मोलगीचे अंतर पाहता व लोकांची गैरसोय लक्षात घेता, सदर निवेदनाची गंभीरतेने दखल घेऊन कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कारभार हा मोलगी पोलीस ठाण्याहुन अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात येऊन तसे आदेश संबंधित विभागास देण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्याकडे . ॲड. रुपसिंग वसावे यांनी केली आहे.