दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १० मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार असून मतमोजणी १३ मे रोजी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. असे असतानाच ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.
दिल्ली, पंजाबनंतर आम आदमी पार्टी आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटकमध्ये सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. केजरीवालांनी ही घोषणा केल्यामुळे भाजप आणि काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे.
आम आदमी पार्टी आता कुणाला टक्कर देणार? हे निवडणुकीच्या वेळीच पाहायला मिळणार आहे. केजरीवालांनी याआधीच कर्नाटकमध्ये रॅली देखील काढली होती. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत आता चार मोठे पक्ष लढणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
भाजप, काँग्रेस, जेडीएस, आम आदमी पार्टी हे मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं असून या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.