दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड दि. ११ (प्रतिनिधी ) मुखेड शहरालगत असलेल्या पश्चिम दिशेकडील दोन पैकी शिरूर दबडे शिवारातून येणाऱ्या नदीचे खोलीकरणाचे काम कमळेवाडी फाट्यापासून अर्धवट राहिलेल्यामुळे मुखेडशहरात व शिवारात पाणी घूसून भयंकर नुकसान झाले होते. त्याच नदीच्या प्रवाहात पाण्याचा अंदाज न आल्याने गेल्यावर्षी जीवत्तहानी सारखी दुर्दैवी घटना घडली होती. एवढी मोठी दुर्घटना होवूनही प्रशासनाने काहीच धडा घेतला नसल्याचे दिसते.
मुखेड शहराच्या पश्चिम दिशेकडील बाजूने जुन्ना शिकारा या शिवारातून एक नदी येते व दबडे शिरूर शिवारातून दुसरी नदी येते आणि मुखेड येथील सार्वजनिक स्मशानभूमी मोतीनाल्याजवळ येवून मिळते . या दोन्ही नद्यांचा संगम होवून या दोन्ही नद्यांचे पावसाचे पाणी नदीत मावत नसल्यामुळे ते शहरात घुसते . परिणामी नदीकाठची घरे शेती शिवार पूर्ण पाण्याखाली येतो. गेल्यावर्षी यामुळे अनेक गुरेढोरे शेळ्यामेंढ्या वाहून गेल्या. तसेच माणसेही वाहून गेली. एवढे नुकसान व मनुष्यहानी जीवीतहानी होवून ही परिस्थिती जैसे थे आहे. मुखेड लातूर रोड मार्गावर दोन्ही बाजूने नाल्या नसल्यामुळे आश्रमशाळेपासून जे पाणी येते ते शेतातून येत असल्यामुळे या शिवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. कमळेवाडी फाट्यापासून शिरूर दबडे शिवारातून येणाऱ्या नदीचे खोलीकरणाचे काम अर्धवट राहिल्याने नदीकाठच्या शिवारात पाणी शिरून पिके उध्वस्त होत आहेत.
कमळेवाडी फाटा ते मुखेड या अर्धवट राहिलेल्या नदीखोलीकरणाचे काम पूर्ण करून नदीच्या दोन्ही बाजूने भर टाकल्यास होणारे नुकसान टळणार आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. प्रशासनाकडून मात्र अर्धवट राहिलेल्या नदीखोलीकरण कामाबाबत कसल्याच हालचाली दिसून येत नाहीत. मुखेड कंधार फाटा मुख्य हायवे रस्त्याच्या दुतर्फा नाल्या असल्या पाहिजेत मात्र याकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे. संबंधीत प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी नदीकाठच्या शेतकर्यांनी केली आहे.