दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय जोरात चालू असून, जास्तीचा महसूल वाढविण्याच्या नावाखाली उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बेकायदेशीर व बनावट दारू विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. आज महाराष्ट्र’ दिन या ड्रायडेच्या दिवशीही देगलूर व तालुक्यातील मरखेल व खानापूर परिसरातील गावांमध्ये दुकान बंद आणि दारू विक्री चालू असल्याचे दिसून आले. यातून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ असुन कार्यवाहीसाठी पोलीस आणि मलिदयासाठी उत्पादन शुल्क अशीच पद्धत सध्या पाहायला मिळते.
पोलिसांच्या तुलनेत उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कारवाया नगण्य असून देगलूर तालुक्यात राष्ट्रीय सण तर सोडाच पण महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशीही तालुक्यातील सर्वच गावांमध्ये उघडपणे दारू विक्री होत असल्याचे दिसते. ड्रायडेच्या दिवशी दारू विक्रीचा गल्ला मोठा होतो हे खुद दारू विक्री करणारे सांगतात.
वास्तविक देगलूर बीटचे उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक कधीही बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करताना आढळून येत नाहीत. पत्रकार म्हणून कार्यवाही बाबत विचारले असता कुठेच कारवाई झाली नसल्याचे हे उत्पादन शुल्कचे अधिकारी सांगतात. देगलूर तालुक्यातील अधिकृत व अनाधिकृत अशा दोन्हीही पद्धतीने मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारूची विक्री केली जाते. यातच काही मद्यपींच्या मते काही गावांमध्ये बनावट विदेशी दारू उदगीर तालुक्यातून आणून देगलूर तालुक्यांतील काही गावात आणि धाब्यावर वितरित केली जाते.
उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या देगलूर आणि मरखेल पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये बहुतांश ठिकाणी अधिकृत देशी व विदेशी दारूची दुकाने आहेत. या दुकानांमधून राष्ट्रीय सण उत्सव आणि महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी हमखासपणे मद्य विक्री केली जाते. बार हॉटेलच्या एका खिडकीतून दारूच्या बाटल्या दिल्या जातात, तर देशी दारू दुकानाच्या लगत असलेल्या इतर दुसऱ्या एका दुकानात ड्रायडेला हमखास दारू विक्री केल्या जाते. रस्त्यावरील अनेक धाब्यांवर पाहिजे ती दारू मद्यपींना उपलब्ध आहे.
सदरच्या बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्रीतून उत्पादन शुल्क विभागाच्या मरखेल आणि खानापूर बीटच्या उपनिरीक्षकांना मोठा आर्थिक फायदा होत असतो म्हणूनच ड्रायडेलाही मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या दारू विक्री होत असताना त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याची दिसून येत आहे.