
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त व्यापक उपक्रमांचे आयोजन करून मतदारांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. याबैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी 25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. मतदार यादीत मतदारांना आपले नाव शोधण्याबाबत मार्गदर्शन करावे.
मतदार जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषेत पोस्टर व बॅनर लावण्यात यावेत. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निंबध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, स्पर्धां आयोजित कराव्यात. या दिवशी मताधिकार, लोकशाही संबंधी व्याख्याने, परिसंवादाचे आयोजन करावे. विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट तयार करावेत. दिव्यांग, तृतीयपंथी, तसेच 18 वर्षांवरील नवमतदारांना या दिवशी ई-एपिक कार्डचे वाटप करावेत. उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्रस्तीय अधिकारीचा सत्कार करावा.असे विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात यावेत.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.बागडे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतींनी गावातील महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय मतदान दिनाचे बॅनर, फ्लेक्स लावावेत. ग्रामस्थांमध्ये विशेषत: नवमतदारांमध्ये मताधिकार, निवडणूक लोकशाही याविषयी जनजागृती करावी.
राष्ट्रीय मतदार दिवसाविषयी जनजागृती व्हावी म्हणून मताधिकार, लोकशाही याविषयावर रांगोळीचे रेखाटन करावे. ग्रामस्थांसमवेत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घ्यावी. ज्या मतदारांनी नियमितपणे मतदान केले आहे, अशा ज्येष्ठ मतदारांचा सत्कार करावा. हे सर्व कार्यक्रम ‘कोविड- 19’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या मार्गदर्शक सूचनाचे व नियमांचे पालन करून करावे, असे त्यांनी सांगितले.