
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :- कोविडची तिसरी लाट ही ओमिक्रॉनची असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासह ओमिक्रॉनचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा आहे, असेही सांगितले जात आहे. मात्र सहव्याधी असलेल्या किंवा गंभीर रुग्णांच्या तो जीवावर बेतू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत बहुतांश रुग्ण सहव्याधीचे असून त्यांच्या उपचारांसाठी जास्तीत जास्त कालावधी लागत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
मुंबईच्या पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ओमिक्रॉनसह कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनच्या रुग्णांवर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या कोविडचे ६९५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी १८८ रुग्ण आयसीयूमध्ये आहे. ५५० रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे आहेत. यांचा रिकव्हरी दर चांगला असून सरासरी ४ ते ७ दिवसांत बरे होऊन घरी जातात. पण सेव्हन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी जास्त आहे, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.