
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांची आज (शनिवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. तर, युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांना संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. दरम्यान, तीनही विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांच्याजागी अजितगव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे उच्च शिक्षित, शांत, संयमी, मितभाषी आहेत. त्यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. शहराच्या राजकारणाची त्यांना संपूर्ण जाण आहे.