
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- भारतातील सर्वात जुनी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच दिवशी अंडर १९ वर्ल्ड कप विजेता कर्णधार यश धूल याने दिल्लीकडून पदार्पणात शतक झळकावले, तर अनुभवी अजिंक्य रहाणेनं मुंबईकडून खेळताना सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावले. शुक्रवारी मुंबईच्या सर्फराज खानने २५०+ धावा करून आपला दबदबा दाखवला. पण, आजच्या दिवसाचा नायक ठरला तो बिहारचा सकिबुल गनी … त्याने पदार्पणाच्या सामन्यात मिझोरामविरुद्ध कोलकाताच्या जादवपूर विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर ३८७ धावांत विश्वविक्रमाला गवसणी घातली.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तिहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने मध्यप्रदेशच्या अजय रोहेरा याचा प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणातील विक्रम मोडला. अजयने २०१८-१९ च्या रणजी करंडक स्पर्धेत हैदराबादविरुद्ध २६७ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणातील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. सकिबुलने ४०५ चेंडूंत ५६ चौकार व २ षटकारांसह ३४१ धावा केल्या.
या वर्ल्ड रिकॉर्डसह त्याने बाबुल कुमारसह ५३८ धावांची विक्रमी भागीदारीही केली. रणजी करंडक स्पर्धेतील ही चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली आणि चौथ्या विकेटसाठीची तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. बाबुलने ३८७ चेंडूंत २७ चौकार व १ षटकारांसह नाबाद २१८ धावा केल्या आहेत. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर बिहारने ५ बाद ६४६ धावांचा डोंगर उभा केला आहे.