
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज नवी दिल्लीत कोळसा मंत्रालयाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाच्या ‘आयकॉनिक’ सप्ताहाचे उद्घाटन केले. केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी या कार्यक्रमामध्ये दूरदृष्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुरूष, महिला आणि युवकांनी दिलेल्या महान योगदानाची भावी पिढ्या जोपासना करतील. कोळसा क्षेत्राने अधिकाधिक योगदान देऊन ऊर्जा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना रावसाहेब पाटील दानवे यांनी कोळसा क्षेत्राने उत्पादनामध्ये आणखी वाढ करण्याचे आवाहन केले. त्यामुळे कोळसा आयात कमी होवू शकेल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवता येईल, असे ते म्हणाले. कोळसा उत्पादन करणा-या सार्वजनिक उपक्रमांनी सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची गरज मंत्र्यांनी अधोरेखित केली. पर्यावरण रक्षण आणि कोळसा खाणींच्या परिसरामध्ये वास्तव्य करणा-या लोकांचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत खाणकाम सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.