
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रतीवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखल करणे बाबत फेरविचार व्हावा
उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यासाठीही पाठपुरावा करणार
उदगीर / प्रतिनिधी :
संजय गांधी निराधार आणि विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखल करण्यासंबंधी प्रशासनाकडून होत असलेल्या सक्तीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेत निराधारांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र दाखल करणेसाठी दोन महिन्याची मुदतवाढ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिक माहीती अशी की, संजय गांधी निराधार आणि विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी हयात असल्याचे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे निराधारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरवर्षी तहसील कार्यालयात उत्पन्न प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कागदपत्र दाखल करणे आणि प्रमाणपत्र मिळवणे जिकरीचे बनले आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडे गेल्या आहेत. लातूर शहर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हकीम शेख व लातूर ग्रामिण संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रविण पाटील यांनी यासंदर्भाने पालकमंत्री ना. अमित देशमुख यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश देत निराधारांची हेळसांड, गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या आहेत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानंतर निराधारांना उत्पन्न प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी दोन महिने मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ऑगस्ट २०२२ अखेर हे प्रमाणपत्र आता दाखल करता येणार आहे.
दरम्यान सध्या कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे ज्येष्ठ नागरीक, निराधार यांनी घराबाहेर पडणे, तहसिल कार्यालयात जाऊन थांबणे जिकरीचे होणार आहे. या परिस्थितीत दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखल करण्याऐवजी नॉन क्रिमीलेअरच्या धर्तीवर याबाबत फेरविचार व्हावा, शिवाय २१०००/- रुपये उत्पन्नाची मर्यादा वाढवावी यासाठी आपण शासन स्तरावर तसेच सामाजीक न्याय विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.