दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी केली जावी, अशी मागणी केली आहे.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे, हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावरून उचलबांगडी करावी.” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.