दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला होता आणि त्याच दरम्यान सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला आहे. हा दगड भिरकावण्यात आल्याने उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. तसेच गाडीतील एका व्यक्तीला दुखापत झाली असल्याचं वृत्त समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत हे पुण्यातील कार्यक्रमात उपस्थित होते. त्या कार्यक्रमातून निघाल्यानंतर उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हे अति होत आहे. यांना चिथावण्यात आलं आहे. एक लक्षात ठेवा राज्यातील जनता अशा गोष्टींसाठी तुम्हाला साथ देणार नाही. आम्ही संयमाने आणि तुम्हीही संयमाने आपलं राजकारण करावं. आमच्यावर अशाच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम भोगावे लागतील. विचारांची लढाई विचारांनी लढावी.