दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : इस्रोने रविवारी यशस्वी लाँचिंग केलेले दोन उपग्रह अंतराळात गेल्यावर मात्र भरकटले आणि चुकीच्याच कक्षेत शिरले. सेन्सर फेल झाल्यामुळे या दोन्ही उपग्रहांचा संपर्क तुटला आहे.
त्यामुळे प्रचंड मेहनत घेऊन ‘स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल डी-1’ या नव्या रॉकेटचे यशस्वी लाँचिंग करणाऱया इस्रोच्या अंतराळ संशोधकांची मोठी निराशा झाली आहे. भरकटलेले उपग्रह अंतराळ मोहिमेत कुचकामी ठरले आहेत. मोहिमेतील या अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोने एक विशेष समिती नेमली आहे.
इस्रोने आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच पॅड-1 वरून रविवारी सकाळी 9.18 च्या सुमारास नवीन रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वीरीत्या पार पाडले होते. या रॉकेटसोबत आझादी सॅट उपग्रह पाठवले गेले होते. याचे 75 पेलोड देशाच्या ग्रामीण भागातील 75 सरकारी शाळांच्या 750 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बनवले होते. पेलोडची डिझाईन करणाऱया विद्यार्थिनीदेखील रॉकेटच्या प्रक्षेपणावेळी श्रीहरिकोटा येथे उपस्थित होत्या. रॉकेटने दोन्ही उपग्रहांना अंतराळात पोहोचवले. मात्र त्यानंतर उपग्रहांकडून डाटा मिळणे बंद झाले. सेन्सर फेल झाल्यामुळे हे उपग्रह भरकटल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामागील इतर कारणांचा तपास करण्यासाठी इस्रोने विशेष समिती नेमली आहे.
भरकटलेल्या उपग्रहांपैकी ईओएस -02 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे . हा उपग्रह दहा महिने अंतराळात काम करतो . त्याचे वजन 142 किलो आहे . यात मध्यम आणि लांब तरंगलांबीचा इन्फ्रारेड कॅमेरा आहे . या कॅ मेऱयाचे रेझोल्युशन सहा मीटर असून त्याआधारे रात्रीच्या वेळीही निरीक्षण करता येते .