दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि.12: जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापूर्वी प्रथम तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये सबंधित तालुक्यातील तहसीलदार तथा अध्यक्ष किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्याकडे सबंधित महिला अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधितांनी दोन प्रतीत करणे आवश्यक आहे. तक्रार, अर्ज तसेच निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे.
अर्जदार महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या १५ दिवस अगोदर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय पुणे येथे पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या महिलांनी लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांसह महिला लोकशाही दिनास उपस्थित राहणे आवश्यक आहे.
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापानाविषयक बाबींचे अर्ज, तक्रार तसेच निवेदन वैयक्तिक स्वरुपात नसेल तर अशी प्रकरणे महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, असेही श्रीमती कांबळे यांनी कळविले आहे.