दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
धकाधकीच्या जीवनात मानवास विविध आजार उद्भवत आहेत. उपचारासाठी खाजगी दवाखान्यात गेल्यास प्रचंड प्रमाणात उपचाराची रक्कम असल्याने ते सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णाला परवडणारे नसल्यामुळे आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबातील रूग्णास शासकीय दवाखान्यात उपचार घ्यावे लागते. परंतु आजही असे अनेक खाजगी दवाखाने आहेत जे रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहून त्याच्यावर अगदी अल्प व माफक दरात उपचारासाठी लागणारी रक्कम घेवून उपचार करतात. असाच एक प्रकार लोहा शहरात समोर आला असून लोहा शहरात एका खाजगी रुग्णालयात अशा पद्धतीची शस्त्रक्रिया प्रथमतः च झाल्याचे समजते.
मंगरूळ ता. लोहा जि. नांदेड येथील तुकाराम माधव नामोळे या ६५ वर्षे वयाच्या रुग्णास मागील दोन ते तीन वर्षांपासून मूत्र विकाराचा त्रास होता. कुटुंबीयांनी दवाखाने, खाजगी उपचार करून पाहिले परंतु सदर विकार हा कांहीं काळासाठी बरे व्हायचा मात्र पुन्हा उचांबळून यायचा. त्यामुळे रुग्णास असह्य व मरणयातना व्हायच्या. रुग्ण तुकाराम यांचा मुलगा पालेभाजी विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेल्या नमोळे कुटुंबीयांनी रुग्ण तुकाराम यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून डॉक्टरांच्या सल्ल्याने यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या (चाचणी) करून घेतल्या तेंव्हा त्यांना मूत्र पिंडा लगतच्या ग्रंथीची वाढ झाली. त्यामुळे सदर विकार झाला असल्याचे आढळून आले. त्यावर उपचार करण्यासाठी जवळपास ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च अपेक्षेत असल्याचे तेथील डॉक्टरांनी कळवील्याने नामोळे कुटुंबीयांना सदरील खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी रुग्णास घरी आणले. आणि लोहा शहरातील एका मित्राच्या मदतीने “कौशल्या” रुग्णालयाच्या डॉक्टरांना भेटून सर्व तपासणीचे कागद दाखविले आणि स्वतःची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सांगितली. डॉ. विजय गायकवाड आणि त्यांच्या टीमने तत्काळ नांदेड येथील मूत्र विकार तज्ञ डॉ.राजीव राठोड यांची वेळ घेवून दि. १६ ऑगस्ट रोजी मूत्र विकार पीडित रुग्ण तुकाराम नामोळे यांच्यावर लोह्यातील कौशल्या हॉस्पिटल मध्ये अत्यंत अल्प व माफक दरात विना टाक्याची शस्त्रक्रिया करून त्यांना होणाऱ्या असह्य वेदना दूर करत जीवनदान दिले. सध्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत आल्याचे रुग्णालय प्रशासन तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे डॉ. विजय गायकवाड डॉ. हर्षवर्धन टेळकिकर यांच्या नेतृत्वात “कौशल्या हॉस्पिटल” च्या सर्व टीमने अथक परिश्रम घेतले.