दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे : वेगवेगळ्या कंपनीमार्फत तुम्हाला भेटवस्तू देणार असल्याचे सांगून प्रेझेटेशनच्या नावाखाली देशा परदेशात फुकट सफर, राहण्याची सोय करणार असल्याचे आमिष दाखवून तरुणांना गंडा घालणार्या कंपनी व त्यांच्या एजंटवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे एजंट वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने लोकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले आहे.
याप्रकरणी एका २७ वर्षाच्या शेतकर्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अफताफ इरफान पठाण, श्वेता विरेंद्रकुमार जैस्वाल, स्रेहल विरेंद्रकुमार जैस्वाल, संदीप रमेश गुप्ता आणि विजय चंद्रेपाल मेबाती सर्व रा. मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर २८ एप्रिल २०२२ रोजी फोन आला होता. त्यात आमची अनंतारा हॉस्पिटॅलिटी कंपनी असून कंपनीकडून गिफ्ट व्हाऊचर, हॉलिडे तिकीट गणपतीची चांदीची मूर्ती आणि किचन आर्टीकल सेट भेट देणार आहे. तुम्ही जयहिंद पॅलेस येथे या, असा निरोप दिला. त्यानुसार फिर्यादी गेले. तेथे त्यांना आरोपींनी आम्ही तुम्हाला भारत तसेच भारताबाहेर टुरवर फिरायला नेणार असल्याचे सांगून त्यासाठी ३० हजार रुपये भरायला सांगितले. त्यांनी पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडून मोबाईल घेतला. त्यांच्याकडून पासवर्ड विचारला. नंतर त्याच्या खात्यावरून आणखी ६० हजार काढले गेल्याचे निष्पन्न झाले. इंग्रजीमध्ये असलेल्या बाँड पेपरवर त्यांच्या सह्या घेतल्या आणि फसवणूक केली.