दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना करुणा शर्मावरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला. यावरुन आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा समचार घेतला.
प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हवी अशा शब्दात थेट अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं.
तुमचा सगळा प्रवास मला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी एकदा दया, माया, करुणा दाखविली पण परत परत दाखविता येणार नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी मुंडेंना टोला लगावला होता.
दरम्यान, आज विरोधक पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सभागृहात जागृत राहून काम करत असतो. काही जण बोलता बोलता समोरून प्रतिसाद मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो. पण प्रत्येकानं बोलताना एक मर्यादा ठेवायला हवी. आपल्याकडून काही चूक होऊ देता कामा नये अशा शब्दात अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं.
तसेच, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो, सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं मत आहे की वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच कुणी कुणाची करू नये. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे. असही अजित पवार यावेळी म्हणाले.