दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
लिव्हरपूल : चेल्सी आणि लिव्हरपूल या बलाढय़ संघांना प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये धक्कादायक पराभवांचा सामना करावा लागला. ब्रायटनने चेल्सीला ४-१ असे, तर लीड्स युनायटेडने लिव्हरपूलला २-१ असे पराभूत केले.
चेल्सीचे प्रशिक्षक ग्रॅहम पॉटर गेली तीन वर्षे ब्रायटनला मार्गदर्शन करत होते. या हंगामादरम्यान चेल्सीने पॉटर यांची प्रशिक्षकपदी निवड केली. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना खास होता. मात्र, त्यांच्या चेल्सी संघाला चांगला खेळ करण्यात अपयश आले. लिअँड्रो ट्रोसार्डने पाचव्या मिनिटाला गोल करत ब्रायटनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेल्सीच्या रुबेन लॉफ्टस-चीक (१४व्या मिनिटाला) आणि ट्रेवो चॅलोबा (४२व्या मि.) यांच्याकडून झालेल्या स्वयंगोलमुळे मध्यंतराला ब्रायटनकडे ३-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात चेल्सीने आक्रमणाची गती वाढवली. ४८व्या मिनिटाला काय हावेट्झने चेल्सीसाठी गोलही केला. मात्र, त्यानंतर ब्रायटनचा भक्कम बचाव चेल्सीला भेदता आला नाही. अखेरीस ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत पास्कल ग्रॉसने गोल करत ब्रायटनला सामना ४-१ अशा फरकाने जिंकवून दिला.
दुसरीकडे, लिव्हरपूल आणि लीड्स यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पहिल्या १५ मिनिटांतच रॉड्रिगो (चौथ्या मि.) आणि मोहम्मद सलाह (१४व्या मि.) यांनी अनुक्रमे लीड्स आणि लिव्हरपूलसाठी एकेक गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमणावर भर दिला. मात्र, त्यांना दुसऱ्या गोलसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. अखेर ८९व्या मिनिटाला समरव्हिलने गोल नोंदवत लीड्सला अनपेक्षित विजय मिळवून दिला.
मँचेस्टर सिटी विजयी
तारांकित आघाडीपटू अर्लिग हालँडच्या अनुपस्थितीतही मँचेस्टर सिटीला प्रीमियर लीगमध्ये विजय मिळवण्यात यश आले. मँचेस्टर सिटीने लिस्टर सिटीवर १-० अशी मात केली. मँचेस्टरकडून निर्णायक गोल केव्हिन डीब्रएनेने (४९व्या मिनिटाला) फ्री-किकच्या माध्यमातून केला. अन्य लढतींत, टॉटनहॅमने बोर्नमथचा ३-२ असा, तर न्यूकॅसलने अॅस्टन व्हिलाचा ४-० असा पराभव केला.