दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
आंध्रप्रदेश येथे होणार राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा
जव्हार:- जव्हार तालुका हा आदिवासी बहुल व ग्रामीण असा दुर्गम भाग असलेला तालुका असून या ग्रामीण भागातील अनेक मुले आपल्याला मिळेल त्या साधनांच्या साह्याने आपापल्या विविध खेळात पारंगत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.जव्हार तालुक्यातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या परंतु सध्या डहाणू तालुक्यातील एकलव्य प्रेसिडेंट स्कूल बोर्डी येथे शिक्षण घेत असलेल्या स्नेहल जानू खुरकुटे या विद्यार्थिनीने तायक्वांदो या खेळ प्रकारात आपले कौशल्य दाखवून आपले नाव उज्वल केले आहे.
तिने डहाणू येथे तालुकास्तरीय स्पर्धेत व नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ग्रामीण भागात आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या तायक्वांदो या खेळ प्रकारात ती आता राष्ट्रीय स्तरावरील आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.ग्रामीण भागात तायक्वांदो या खेळ प्रकाराची स्नेहलने नवी ओळख निर्माण करून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यावर चहुबाजूने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.या स्पर्धेसाठी तिला तिचे प्रशिक्षक सध्या मॅडम व आई-वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले आहे.