दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
असा मेसेज काही महिने झाले व्हाट्सअँप, फेसबुक आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म वर फिरतोय. यापूर्वी असाच मेसेज ‘अदानी आशियातील एक नम्बरवर आले असून त्याबद्दल फ्री रिचार्ज’ असा मेसेज फिरत होता.
आणि अनेकजण या “मोफत” च्या लोभापायी त्या लिंकला(link) क्लिक करून बसले अन गोत्यात आलेत. काहींचे फोन हॅक(phone hack) झालेत तर काहींचे बँक अकाउंट रिकामे झालेत ! हल्ली थोडं काही मोफत मिळतेय म्हटलं की उत्सुकतेने लोक अशा लिंक क्लिक करतात अन नंतर गोत्यात येतात ! आणि मग नंतर आमच्यासारख्या कडे येतात.
गंमत म्हणजे हे जे गोत्यात येणारे असतात न त्यातले ७०% “जवळचेच” असतात. ज्यांनी नियमितपणे तुमच्या वॉल वर हजेरी लावलेली असते. सायबर फ्रॉड(Cyber Fraud) च्या पोस्ट देखील वाचलेल्या असतात ! मग तरी कसे अडकतात ? मलाच आता हे कोडे पडलेलं !
आजच हा मेसेज मित्राचा आलेला अन म्हणाला की
“चुकून लिंक क्लिक केली अन ती ओपन झाली”
अरे…… चुकून कशी लिंक ओपन होते ?
झोपेत असता की अफू खाल्लेली असते त्यावेळी ?
या जगात मोफत काहीही मिळत नसत. हे आधी लक्षात घ्या. अगदी साडी खरेदीला गेलात आणि त्यावेळी दुकानदाराने कोल्ड्रिंक पाजले तरी ते मोफत नसते. तुमच्याच साडीच्या किमतीत ते इन्क्ल्युड केलेले असते. इतकं बेसिक सर्वाना माहित असत. तरी मोफत च्या मोहात का पडता ? जगाच्या पाठीवर काही भारतीय लोकांनी झेंडा फडकवला, कर्तृत्व गाजवले की त्याचा फायदा असे हॅकर लोक घेतात. आणि तुम्हाला मोहात पाडतात. त्यापासून सावध राहा. मुळात तुम्हाला एखादी गोष्ट मोफत का हवी ? हि मानसिकता बदला आधी मग आपोआप हे हॅकर तोंडघशी पडतील अन तुम्ही सुरक्षित राहाल. नका पडू फुकटच्या मोहात. कळकळीची विनंती.