दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
कोरोनापासुन प्रवेशद्वार बंद, खिडकीद्वारे व्यवहार चालु
बॅक प्रशासनाचा “प्रताप” संचालक मात्र गप्प शेतकऱ्यांचे बेहाल
दार बंद खिडकी चालु पध्दत बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – सुरेश पा हिलाल
लोहा : – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोहा येथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाच्या प्राप्तीसाठी अतोनात हाल होत असून बैंकेचे पदाधिकारी केवळ आणि केवळ नावालाच शिल्लक राहिले आहेत. याकडे त्यांचे सर्रास पुणे दुर्लक्ष होत असल्यामुळे वरिष्ठ बैंक प्रशासन कुंभकर्ण झोपेत असल्यामुळे गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेचे बेहाल होत आहेत. अतिवृष्टी अनुदानाच्या रक्कमेसाठी शेतकऱ्यांना चकरावर चकरा माराव्या लागत आहेत, दलालांनी बैंकेत ठाण मांडले असून “गेट बंद विंडो चालु” थांबले पाहिजे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोहा तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल खांबेगावकर यांनी दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रक्तवाहिनी म्हणून गणली गेलेली दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून पूर्वी शेतकऱ्यांच्या ऊसाचे, ज्वारीचे,कापसाचे, विम्याचे,अनुदानाच्या रकमा ह्या ची सर्व आर्थिक उलाढाल याच बँकेतून होत असत. याबरोबरच जिल्हा परिषदेतील सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बिल यासह अन्य व्यवहार अतिशय सुरळीतपणे होत असत. सद्यस्थितीत बँकेला अतिशय वाईट दिवस आले असल्याने व कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे त्यातच दलालांचा सुळसुळाट होत असल्यामुळे, गोरगरीब शेतकरी कष्टकरी वर्गाचे अतिशय हाल होत आहेत. यातच लोहा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना अतिशय तुच्छ वागणूक देत असून दिवसभर मुख्य दरवाजा/शटर बंद ठेवून खिडकीवाटे व्यवहार केला जात आहे.
कोणत्याही प्रकारची यादी बँकेच्या फलकावर व भिंतीवर लावली जात नाही यातूनही यादीत नाव पाहण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक रकमा सस्पेन्सला पडत असून यासाठी कित्येक दिवस चकरा माराव्या लागत आहेत याकडे मुजोर प्रशासन व निर्लज्ज पदाधिकारी केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट देऊन पहात असल्यामुळे शेतकऱ्यांचे बेहाल होत आहेत.शेतकरी अक्षरशः मेटा-कुटीला आलेला आहे. यापूर्वी अनेक गावच्या शेतकऱ्यांनी संबंधित स्टाफ व प्रशासनाच्या विरोधात तक्रारी केल्या तरीही याला पाठीशी घालण्यात पदाधिकारीच कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे.
गेली कित्येक दिवसापासून वर्षानुवर्ष “गेट बंद विंडो चालू” असल्यामुळे त्यातच कित्येक शेतकऱ्यांना एटीएम सुविधा नाही, कित्येकांकडून चिरीमिरी घेतली जात आहे. अनुदान बँकेत उपलब्ध होऊन बरेच दिवस लोटले तरीही शेतकऱ्यांना आपल्या आपापल्या गावाची यादी लागण्याची वाट पहावी लागत आहे. यादी पाहायला पैसे तर वेगळीच मोजावे लागतात तीच यादी जर बँकेच्या फलकावर लावली अन्यथा भिंतीवर लावली तर शेतकऱ्यांचे आर्थिक भुर्दंड, होणारे हाल थांबतील. पूर्वीप्रमाणे गेट चालू ठेवले तर बड्या धेंडांना लाईन मध्ये राहून पैसे काढावे लागतील. गोरगरिबांचे हाल होणार नाहीत. आर्थिक पिळवणूक होणार नाही. दलाली हा प्रकार नावालाही उरणार नाही.
यासाठी बँकेच्या वरिष्ठ प्रशासनानी, पदाधिकाऱ्यांनी तथा संबंधित संचालकांनी वेळीच लक्ष दिले तर गोरगरिबांचे हाल होणार नाहीत. हे सर्व जर लवकरात लवकर थांबले नाही तर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोहाच्या “गेट बंद विंडो चालू” मध्यवर्ती सहकारी बैंक प्रशासनाच्या विरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांनी दिला आहे.