दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहराचे लोकनेते कै. मष्णाजीराव निलमवार यांनी जय हनुमान व्यायाम शाळेची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात देगलूरची ख्याती नोंदविणाऱ्या वैकुंठवासी सद्गुरु श्रीहरी महाराज पुण्यतिथी दिंडी निमित्त शहरात कुस्त्याचा फड रंगविला ज्यामुळे हरी महाराज पुण्यतिथी निमित्त तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मल्ल या कुस्तीच्या सामन्यांमध्ये सहभागी व्हायला लागले. ही परंपरा गेल्या 32 वर्षापासून चालू आहे.लोकनेते मष्णाजीराव निलमवार यांच्यानंतर माजी उपनगराध्यक्ष अविनाश मष्णाजीराव निलमवार यांनी हा वारसा अविरतपणे चालवीत या कुस्त्यांचे भव्य-दिव्य असे सामने पुण्यतिथीनिमित्त आयोजित केले. या कुस्त्यांच्या सामन्यात 243 कुस्तीपटूंनी आपला सहभाग नोंदविला विशेष म्हणजे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच खुल्या कुस्त्यांच्या सामन्यांमध्ये एका 14 वर्षीय राज्यस्तरीय महिला खेळाडूंनी या खेळाच्या सामन्यांमध्ये सहभाग नोंदवीत विजय मिळविला त्यामुळे या सामन्याला लोकांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली. नेहमीच या कुस्त्यांमध्ये लहान- मोठी मल्ल सहभागी होतात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या कुस्त्यांच्या सामन्यामध्ये ग्रामीण भागातील तसेच शहरी खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण व्हावे याचे प्रयत्न नेहमीच अविनाश निलमवार यांनी केले आहे.
या सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी देगलूर येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत पाटील राजूरकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजीअण्णा शिरशेटवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर, नंदूशेठ शाखावर,माजी नगरसेवक सुनिल यशमवार, माजी नगरसेवक संजय चिनमवार, माजी नगरसेवक तुळशीराम संगमवार, शैलेंद्र चव्हाण, शहराचे पोलीस पाटील राष्ट्रवादीचे अनिल तोताडे, माजी नगरसेवक बालराज माळेगावकर, संजू अण्णा मंगलावार, माजी सैनिक जयराम कडलवार, बोडके पैलवान, दिपक कोमावार आदी शहरातील मान्यवर तसेच अविनाश निलमवार मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते
गेल्या अनेक वर्षांपासून देगलूर शहरांमध्ये दिंडीनिमित्त कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन करण्यात येते. कुस्त्यांच्या दंगलीत नांदेड येथील प्रसिद्ध पैलवान राजू आणि उदगीर येथील पहिलवान प्रसाद उदगीरकर यांच्यामध्ये शेवटचा सामना रंगला .
जवळपास 1 तास 13 मिनिटे चाललेल्या या सामन्यांमध्ये दोन्हीही पैलवानांनी अटीतटीच्या चुरशीत बरोबरीचा सामना पाहायला मिळाला त्यामुळे पंचांच्या निर्णयानुसार शेवटी दोघांनाही थांबवून सामना बरोबरीत सोडविण्यात आला.
लोकनेते मष्णाजीराव निलमवार साहेबांनी आयोजित केलेल्या कुस्त्यांचे सामने अविरतपणे चालू ठेवण्याचं काम कै.मष्णाजीराव निलमवार साहेब मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.येणाऱ्या काळामध्ये देगलूर शहरातील व तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील महिलां-पुरुष खेळाडूंना राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारता यावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू व येणाऱ्या काळामध्ये खेळाडूंसाठी आणखी काही आम्हाला नाविन्यपूर्ण उपक्रम घेता येतील का? याचाही आम्ही विचार करू असे अविनाश निलमवार यांनी आपल्या प्रास्ताविक पर विचार व्यक्त केले. या कुस्त्यांच्या सामन्यांसाठी ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येने खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते. कालच्या कुस्त्यांच्या सामन्यामुळे शहरांमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन झाल्याचे प्रेक्षकांनी सांगितले.