दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या सौजन्याने जागतिक महिला दिन हा सर्वत्र साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती मुखेड व पंचायत समिती कार्यालय मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ८ मार्च २०२३ रोजी मुखेड न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.महाले, सह दिवाणी न्यायाधीश एन.एस.बारी, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश वाय.बी.गमे, पुरोगामी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यु.बी.सोनटक्के, पोलीस निरीक्षक रमेश वाघ, गटविकास अधिकारी मिथुनकुमार नागमवाड, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाले, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. व्ही. येवतीकर. यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुखेड न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.महाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. कायदे हे आपल्या संरक्षणासाठीच आहेत त्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे असा त्यांनी यावेळी अनमोल संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात स्त्री चळवळीच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुखेडचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे यांनी केले.व त्यानंर ॲड.एम.ए.शेख यांनी उपस्थित महिलांना पोक्सो या कायद्याबद्दल मार्गदर्शन केले, ॲड. शारदा पाटील यांनी ॲसिड अटॅक या कायद्याबद्दल तर ॲड.ए.जी.तेलंग यांनी पोटगी कशी मिळवावी याबद्दल महिलांना सविस्तर मार्गदर्शन केलेे. ॲड.मिलिंद कांबळे यांनी महिला जागृती गीत व बोमनाळी येथील अंगणवाडी सेविका ज्योती कांबळे यांनी स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधक गीत सादर केले. तर बालवक्ता गुरुप्रसाद शिंदे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या गोड वाणीने महिलांना शुभेच्छा देण्यासाठी केलेले भाषण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
सदर कार्यक्रम दोन सत्रांमध्ये घेण्यात आला असून पहिल्या सत्रात विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान करून त्यांना कायदेविषयक पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले, तर दुसऱ्या सत्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत रक्त तपासणी करून वैद्यकीय सल्लाही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मुखेड येथील सांस्कृतिक विभागाच्या शिक्षिका सविता उमाटे यांनी केले तर सहा. गटविकास अधिकारी एस.व्ही.येवतीकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी मुखेड न्यायालयाचे एम.पी.मुखेडकर, एम.बी.ताटे, व्ही.एस.पांचाळ यांच्यासह पंचायत समिती कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, व तालुका विधी सेवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.