दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्हा लोकसभेचे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना पुन्हा एकदा जीवे ठार मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती दस्तूरखुद्द खा.जाधव यांनीच दिली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी अशीच जीवे ठार मारण्याची सुपारी खा.जाधव यांना पहिल्यांदा नांदेडच्या रिंधा टोळीकडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा जीवे ठार मारण्याच्या सुपारीचा प्रकार खा.जाधव यांच्या बाबतीत पुढे आल्यामुळे संपूर्ण परभणी शहरात प्रचंड खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे.
मागील ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय असलेले संजय जाधव २००४ मध्ये परभणीतून शिवसेनेचे पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर पुन्हा २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यांच्या कार्याचा वाढता झंझावात बघून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २०१४ साली संजय जाधव यांना थेट लोकसभेत पाठवले. तीच पुनरावृत्ती २०१९ ला सुध्दा झाली. अगोदर विधानसभा आणि त्यानंतर सलग दोन वेळा लोकसभेवर खासदार म्हणून कार्यरत असलेले संजय जाधव यांना रुपये तीन कोटींसाठी जीवे ठार मारण्याची सुपारी पुन्हा एकदा देण्यात आलीय. परिणामी खा. जाधव यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती थेट परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांना दिली आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रकरणाची माहिती देत खा.संजय जाधव यांनी यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. एकूणच या साऱ्या भयानक घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे. सरकारने या प्रकरणाची तत्परतेने दखल घेऊन खा. जाधव यांना संरक्षण तर द्यावेच शिवाय या मागील कारस्थानात जे कोणी सामील आहेत,त्यांची कसून चौकशी करुन त्यांना जेलची हवा तात्काळ दाखविली जावी, अशी मागणी खा.जाधव यांच्या चाहत्यांकडून केल्याचे पुढे येत आहे.