
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड/गेवराई— राज्य सरकारने राज्यातल्या एसटी महामंडळा मार्फत विविध आगारासाठी डिझेल खरेदीसाठी निधी दिला आहे. मात्र तो निधी अत्यंत अपुरा असून, तालुका आगाराचे दैनंदिन उत्पादन कमी आणि डिझेलचा खर्च अधिक होत आहे. त्यामुळे गेवराई आगारासह बीड जिल्ह्यातील पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई आदी आगारातील एस. टी. बसला पुरेसे डिझेल मिळत नसल्याने अनेक गाड्यांच्या फेन्या नाविलाजाने रद्द कराव्या लागल्या आहेत. याचा शालेय विद्यार्थ्यांनसह महिला, पुरुष आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठा फटका बसला असून, बस स्थानकावर एस. टी. बसची वाट बघत दिवसभर या प्रवाशांना ताटकळत बसावे लागले आहे. साधे एस. टी. बसमध्ये डिझेल भरायला पुरते पैसे नाहीत तर मग फुकटच्या योजना जाहीर करता कशाला असा संतप्त सवाल प्रवाशांनी राज्य सरकारला केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सरकारने एस टी महामंडळाच्या बस मध्ये सर्व महिलांना अर्धे तिकीट माफ केले असून ७५ वर्षा पुढील वय असणाऱ्या नागरिकांना बसचा प्रवास फुकट केला आहे. यामुळे एस टी च्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली असली तरी त्यांना अपेक्षित असलेले उत्पन्न अद्यापही वाढले नाही. पाथर्डी ते खरवंडी यादरम्यान प्रवास करणाऱ्या एका बस मध्ये तर १०० पेक्षा अधिक प्रवासी बसले होते. मात्र त्या बसला उत्पादन झाले केवळ ७६५ रुपये. यावरून एसटी महामंडळाकडे दररोज किती पैसा जमा होतो? याचा अंदाज येतो. गेवराई आगारामध्ये दररोज साडेतीन ते चार लाख रुपये प्रवाशांच्या तिकिटाचे जमा होतात. मात्र यासाठी बसला डिझेल लागते सरासरी पाच लाख रुपयांचे. अशा परिस्थितीत ही तूट कशी भरून काढायची? हा एस टी महामंडळासह कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न आहे. दिनांक २७ मार्च आणि २८ मार्च या दोन दिवशी डिझेल नसल्याने गेवराई आगाराच्या अंदाजे ५० हून अधिक बस जाग्यावर उभ्या होत्या. यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक आणि परजिल्ह्यात जाणारे प्रवासी यांना बस न मिळाल्याने आणि त्यासोबतच बस का बंद आहे? याचे ठोस कारण माहीत नसल्याने ते दिवसभर बसची वाट बघत बसस्थानकावर ताटकळत बसले होते. विशेष म्हणजे ज्या शालेय विद्याथ्यांनी वर्षभराच्या पासचे पैसे ऍडव्हान्स मध्ये एस टी महामंडळाकडे भरलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनाही डिझेल अभावी बंद असलेल्या बसचा फटका बसला आहे. अनेक विद्यार्थी खाजगी गाड्यांना लटकून प्रवास करताना दिसले. एकीकडे एँडव्हान्स पैसे भरणा-यांना प्रवासासाठी बस उपलब्ध नाही आणि दुसरीकडे मात्र अर्धतिकीट आणि फुकट प्रवास योजना लागू केलेले प्रवासी इतर जिल्ह्यातुन आलेल्या बसमधून प्रवास करताना दिसले. बस बंद असल्याने परीक्षार्थी विद्यार्थी बेचैन आणि हातबल झाल्याचे दिसले. सोबत तिकिटाला पैसे नसल्याने विद्यार्थी रडकुंडी आले होते. दिनांक २८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास बारा हजार लिटरचे एक डिझेलचे टैंकर गेवराई आगारात पोहोचले. उभा असलेल्या ५२ बस पैकी स्थानिक गाड्यांमध्ये प्रत्येकी १८० लिटर तर बाहेर तालुक्यात व जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या गाड्यांमध्ये २५० लिटर डिझेल तात्काळ भरण्यात आले. हे डिझेल केवळ दोन किंवा तीन दिवस पुरेल त्यानंतर पुढे काय हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.