दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम जिल्हा – वसंत खडसे
वाशिम : शेती हा मानवी संस्कृतीचा सर्वात प्राचीन व्यवसाय असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु हा व्यवसाय संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याकारणाने अस्मानी संकटा सोबतच सुलतानी संकटांचा सामना करण्याची नौबत दिवसागणिक वाढत चालली आहे. अतिवृष्टी, अल्पवृष्टी,तर कधी गारपीट आदी नैसर्गिक निरूपाय असलेल्या संकटाची तर बातच सोडा, पण शेतात पडून असलेले शेती उपयोगी साहित्य, शेतातील भाजीपाला, फळ फळावर चोरून नेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोबतच काही अज्ञात विघ्नसंतोषी कडून जाणीवपूर्वक शेत पिकाला हानी पोहोचवण्याचा प्रकार घडत आहे. यावर मात करण्यासाठी रिसोड तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या लोणी बुद्रुक येथील शेतकरी अनिल उर्फ दीपक बोडखे यांनी आपल्या अनोख्या संकल्पनेतून शेताच्या रखवाली साठी शेतात क्लोज सर्किट कॅमेरे लावून क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी यांत्रिक ” तिसरा डोळा ” बसवला आहे. त्यांच्या या अफलातून प्रयोगाच्या नवलाईची चर्चा सद्यस्थितीत सर्व दूर पसरत आहे.
लोणी बुद्रुक येथील शेतकरी अनिल बोडखे हे पारंपारिक शेतीला छेद देऊन नवनवीन प्रयोगात्मक शेती करणारे शेतकरी म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे १५ एकर शेती असून त्यांनी आपल्या शेतात वाल, कारले, वांगी आदी भाजीपाल्याची लागवड करून विविध फळांच्या झाडांची सुद्धा लागवड केली आहे. परंतु भाजीपाला चोरून नेऊन इतर भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, शेतकरी अनिल बोडके हे वैतागून गेले होते. त्यातच त्यांनी शेतात लागवड केलेल्या काही फळझाडांची कोण्या तरी अज्ञात विघ्नसंतोषी व्यक्ती कडून जाणीवपूर्वक कत्तल केल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.परिणामी ते कमालीचे हैराण झाले होते. रखवाली साठी माणूस मिळत नसल्याच्या विवंचनेत असताना त्यांना क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्याची संकल्पना सुचली व त्यांनी ती प्रत्यक्षात अमलात आणली. आपल्या शेतात त्यांनी सौर उर्जेवर चालणारे दोन फिरते सर्किट कॅमेरे बसवले आहेत. यासाठी त्यांना सतरा ते अठरा हजार रुपयाचा खर्च सोसावा लागला असला; तरी शेताच्या रखवालीचा प्रश्न मात्र कायमचा सुटला आहे. या माध्यमातून शेतकरी बोडखे आता आपल्या मोबाईल वरून रात्री बेरात्री आपल्या शेताचे सहज राखण करू शकतात. त्यांचा हा प्रयोग आसपासच्या भागासाठी पहिलाच असल्याकारणाने पंचक्रोशीतील इतर शेतकरी मंडळी अनिल बोडखे यांचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या शेताकडे येत आहेत.आणि त्यांनी शेतात बसविलेल्या “तिसऱ्या डोळ्याकडे” कुतूहलाणे पहात आहेत. शेताच्या संरक्षणासाठी कॅमेरे बसवणारे बोडखे हे बहुदा या भागातील पहिलेच शेतकरी असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
” शेतात नेहमीच छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना व नाहक त्रास होत असल्याने, यावर प्रतिबंध घालण्यासाठी रात्रपाळीचा रखवालदार मिळत नव्हता. यात फार वैतागून गेल्यामुळेच मला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कल्पना सुचली व ती अमलात आणली.
__ अनिल उर्फ दीपक बोडखे
( शेतकरी, लोणी बुद्रुक )