दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :गेल्या काही दिवसांपासून शहानूर नदी पात्र प्रदूषित झाल्यामुळे तसेच जैविक वैद्यकीय कचरा नदी पात्रात आढळल्याने शहानूर नदीचे हाल निदर्शनास पाहायला मिळत आहेत.प्रदूषणाने वेढलेली शहानूर नदीची मृतावस्था नागरिकांचा चर्चेचा विषय बनला असून परिसरात एकच खळबळ माजली आहे.आमच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आलेला जैविक वैद्यकीय कचऱ्या संबंधी पाठपुरावा करून संबंधित विभागाशी संपर्क साधला असता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर डोंगरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल नालट यांनी सदर घटनास्थळाची तपासणी करून मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना सदर शहानूर नदी पात्रातील आढळलेला जैविक वैद्यकीय कचरा हा शासकीय रुग्णालयातील नसल्याची माहिती दिली व न.प.मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी आरोग्य विभागाला निर्देश देत न.प.आरोग्य विभाकडून मौका चौकशी करून अहवाल मागविला असून सदर जैविक वैद्यकीय कचरा जप्ती करून नियम उल्लंघन करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
न.प.मुख्याधिकारी यांच्या निर्देशानुसार शनिवार दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान शहानूर नदी पात्रातील जैविक वैद्यकीय कचरा आरोग्य विभागाकडून जप्त करण्यात आला आणि आरोग्य विभागाकडून संबंधित विभागाला नोटीस बजावल्याचे आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली.आता पुढील कारवाई निर्णायक असून ४७ स्टार रँकिंग मिळविलेली न.प.कार्यालय अंजनगाव सुर्जी शहानूर नदी साफ-सफाई संदर्भात जागृत होणार का? शहानुर नदी साफ-सफाई संदर्भात सदर अधिकारी वर्ग विचार करेल का?परिसरातील डॉक्टरांना शहानूर नदी पात्रात आढळलेल्या इंजेक्शन बॉटल संबंधी विचारणा करेल का? जैविक वैद्यकीय कचरा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई होणार का? असे प्रश्न नागरिकांना भेडसावत असून नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला उधाण आले आहे.