दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (ता. १७) सायंकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस शाह यांच्याशी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे.राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. काही आमदार गुडघ्याला बाशिंगही बांधून बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीही अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळीही मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे बोलले जात होते.
या चर्चांमुळे महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सत्ताधारी आमदार म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही तो झाला नसल्याने विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत.