तो लैच कुल ‘, युवराजसोबत स्क्रीन शेअर करताच मराठमोळ्या अभिनेत्रीची भन्नाट पोस्ट…
मुंबई : ‘पांडू’, ‘बंदीशाळा’, ‘धुडगूस’ यांसारख्या मराठी चित्रपटात झळकलेली प्रतिभावान मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. युवराज सिंग आणि हेमांगी कवी हे कोणत्या तरी जाहिरातीसाठी एकत्र दिसणार आहेत. या जाहिरातीच्या शूटदरम्यान अभिनेत्रीला युवराजसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. तिने युवराजसोबतचे फोटो फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिचे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
काय म्हणाली हेमांगी..?
हेमांगीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये युवराज सिंग याच्यासोबतचे 2 फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो व्हॅनिटी व्हॅनमधील आहे, तर दुसरा फोटो समुद्रकिनाऱ्यावरील आहे. या फोटोत दोघांच्या हातात एक छोटासा पांढरा बोर्डही आहे. हेमांगीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “शूटिंग सेट वर येताना प्रचंड सेंकुरिटी ,लवाजम्यासह आगमन ! ऑफकोर्स ते असणारच कारण आऊटडोअर शूट ! त्याचे crazy cricket फॅन्स ! पण चाय से ज्यादा किटली गरम म्हणतात तसलं काही. त्याच्यापेक्षा आजूबाजूच्या मंडळींचीच गडबड अधिक. तो लैच कूल ! आला काय, डायलॉगस बोलला काय! सगळ्यात एक ठासून भरलेला पंजाबी स्वॅग !”
युवराज सिंगचे पुरस्कार…
भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याने त्याच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. त्यातीलच एक विक्रम 1 षटकात 6 षटकार मारण्याचाही आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीत 40 कसोटी, 304 वनडे आणि 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 1900, वनडेत 8701 आणि टी20त 1177 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 3, तर वनडेत 14 शतकांचा समावेश आहे.
युवराजला क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीसाठी 2012 साली ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरवण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2014 साली त्याला ‘पद्मश्री’ या मानाच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.