दैनिक चालु वार्ता
भू म तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गुरुवारी प्रथमच १६ वर्ष वयोगटाच्या आतील गटाच्या मॅट वरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन साहिल गाढवे मित्र मंडळ व मौलाली तालीम संघ भूम यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चव्हाण, पै.नवनाथ जगताप,वस्ताद मामू जमादार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातून तब्बल २१६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत अनुक्रमे २८,३२,३८,४२,५२,६० किलो गटातील मल्लांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये २८ किलो गटातून उस्मानाबाद येथील चंद्रकांत शिंदे प्रथम तर वाकडी येथील सोनमाळी या खेळाडूचा द्वितीय क्रमांक आला तसेच ३२ किलो गटातून भूम येथील टिपू जमादार याचा प्रथम क्रमांक तर भूम येथील गणेश लुंगशे याचा द्वितीय क्रमांक आला तसेच ३८ किलो गटातून भूम येथील यश सरवदे याचा प्रथम क्रमांक तर लोहारा येथील खेळाडूचा द्वितीय क्रमांक आला.४६ किलो गटातून येडशी येथील विजय पवार याचा प्रथम क्रमांक आला तर भूम येथील प्रेम माने याचा द्वितीय क्रमांक आला. ५२ किलो गटातून परांडा येथील शुभम पैलवान याचा प्रथम क्रमांक आला व तेरखेडा येथील सौरभ कडवकर याचा द्वितीय क्रमांक आला.
६० किलो गटातून भूम येथील अस्लम जमादार याचा प्रथम क्रमांक आला तर लोहारा येथील आसिफ मणियार याचा द्वितीय क्रमांक आला.प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या मल्लाना पत्रकार बांधवांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.वेळी सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या भूम येथील अस्लम जमादार या मल्लास मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व सर्व मान्यवरांच्या हस्ते एक किलो चांदीची गदा व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी शहरात प्रथमच मॅट वरील कुस्ती स्पर्धा असल्याने शहरातील तसेच पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुस्ती स्पर्धेचे समालोचन राजाभाऊ देवकते वाकडीकर यांनी केले तर पंच म्हणून उस्मानाबाद येथील गोविंद घाडगे, रामा गोडगे,एन आय एस कोच बालाजी बुरुंगे, महादेव मेटकरी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मौलाली तालीम संघाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.