दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
20 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने कमाईचे विक्रम रचले,
ताज्या आकड्यांनुसार या चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे
मुंबई :- अमुपम खेर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड सुरू आहे. अवघ्या 20 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने कमाईचे विक्रम रचले केले आहेत. ताज्या आकड्यांनुसार या चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून यात वाढत होताना दिसतेय. विवेक अग्निहोत्री निर्मित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या कमाईचे ताजे आकडे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.
‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाची 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री झाल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाने ‘सूर्यवंशी’ या मल्टीस्टारर चित्रपटालाही ओव्हरटेक केले असून महामारीच्या काळामध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून संपूर्ण देशभरात हा चित्रपट चर्चेचा आणि वादाचाही विषय ठरत आहे.
असे असतानाही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट बक्कळ कमाई करत असून शुक्रवारी 19.15 कोटी, शनिवारी 24.80 कोटी, रविवारी 26.20 कोटी, सोमवारी 12.40 कोटी, मंगळवारी 10.25 कोटी आणि बुधवारी 10.03 कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
रेकॉर्डतोड कमाई
‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने सर्वात कमी बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटाने ‘गदर- एक प्रेम कहानी’ या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे. मात्र आगामी काळात आरआरआर या चित्रपटाकडून ‘द कश्मीर फाईल्स’ ला बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटापूर्वी कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘गदर – द प्रेम कहानी’ या चित्रपटाने सर्वाधिक गर्दी खेचण्याचा विक्रम केला होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बनवण्यासाठी 19 कोटी खर्च आला होता आणि चित्रपटाने 76.88 कोटींची कमाई केली होती.