दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंडल ता.धडगाव दि.५ जून रोजी आदिवासी एकता परिषद व कुंडल गाव समितीतर्फे सातपुडा आदिवासी महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. या पंचायतीत ‘निसर्ग व आदिवासी या दोन्ही घटकांमधील नाते’ यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
आदिवासी जीवन पद्धती व संस्कृतीची निसर्गाशी नाळ जुळते. निसर्गाशिवाय आदिवासी संस्कृतीची फारशी कल्पनाच करता येत नाही तर निसर्ग वाचविण्याची ताकद केवळ आदिवासी जीवनपद्धतीतच आहे, म्हणून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही महापंचायत होत आहे. या पंचायतीत परक्या संस्कृतीच्या आघाताने आदिवासी संस्कृतीचा ऱ्हास, प्रगत मानवी जीवनमुल्यांना निर्माण झालेला धोका, बऱ्याच वेळा नानाविध नावे ठेवत, हिणवत आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता व स्वाभिमान यावर बोट ठेवण्याची प्रथा, स्थलांतर व स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, परक्या जातीत आदिवासी मुला-मुलींचे होणारे लग्न व उद्भवणाऱ्या समस्या, सातपुड्यातील दहेजची वाढती रक्कम व निर्माण होणारे धोके. या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे.
या पंचायतीतआदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोकभाई चौधरी, आदिवासी विचारवंत तथा चळवळकर्ते सांगल्याभाई वळवी, व्याराचे माजी खासदार अमरसिंगभाई चौधरी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, एकता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डोंगरभाऊ बागुल, डॉ.सुनिल पऱ्हाड (पालघर), राजू पांढरा, माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास नटावदकर, जि.प.कल्याण सभापती रतनदादा पाडवी, जि.प.चे गटनेते सी.के.पाडवी, सेवानिवृत्त अभियंता जेलसिंग पावरा, करमसिंग पाडवी, ॲड.अभिजित वसावे आदी उपस्थित राहणार आहेत. महापंचायतीला संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन योगेश पाडवी, रवींद्र पाडवी, गणेश पाडवी, कल्पेश पाडवी, चंद्रसिंग पाडवी, राकेश वळवी, सारपा पाडवी, मांगीलाल पाडवी राकेश पाडवी व विनोद पाडवी यांनी केले आहे.