दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीनुसार शहरातील सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या सहा प्रभागात महिलांची मतदान निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणूक शाखेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे.
निवडणुकीसाठी ५८ प्रभाग असून १७३ नगरसेवक असून अन्य प्रभागातील मतदारांची संख्या किमान पन्नास हजारांपासून कमाल ८३ हजार या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सहा मतदार संघात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. गोखलेनगर-वडारवाडी (प्रभाग क्रमांक-१५), फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणा (प्रभाग क्रमांक १६), शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्रमांक १७), शनिवारवाडा-कसबा पेठ (प्रभाग क्रमांक १८), छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ (प्रभाग क्रमांक १९) आणि घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई (प्रभाग क्रमांक २९) या सहा प्रभागात महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रभाग शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत.