दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
पुणे.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ पदाधिकाऱ्यांची राज्याचे शिक्षण आयुक्त मान.श्री विशाल सोळंकी साहेब यांचे सोबत पुणे येथे आज दि.२५/१०/२०२१ रोजी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सुमारे ३ तास चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण संचालक मा. दत्तात्रय जगताप साहेब , मा महेश पालकर साहेब, मा. दिनकर टेमकर साहेब, मा वालझडे साहेब, मा शिंदे साहेब हेही सहभागी होते. महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ संजय शिंदे, सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी शिक्षकांच्या समस्या सविस्तर पणे मांडल्या. चर्चेअंती पुढील निर्णय घेण्यात आले—
१) शैक्षणिक वर्ष १९१८-१९ प्रमाणे सन १९१९-२०, २०-२१, २१-२२ या वर्षाची संच मान्यता करण्यात येईल.
२) वाढीव पदांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून त्याबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाईल.
३) अघोषितचा पदांबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यापूर्वी अवलोकनास मिळावा या मागणीसंदर्भात सदर प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून तो लवकरच अवलोकनासाठी website वर टाकला जाईल व त्यात उणीवा, कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास आवश्यक त्या दुरुस्त्या करून परिपूर्ण प्रस्ताव पुढील आठवड्यात शासनास सादर करण्यात येईल.
४) आय. टी.शिक्षकांना मान्यता व वेतन मिळावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरी साठी पाठविण्यात आला आहे.
५) वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने लवकरच घेण्यात येईल.
६) पवित्र पोर्टल वर दोन विषय नमूद करण्याची तरतूद असावी या महासंघाच्या मागणीशी सहमती असून वाणिज्य शाखेचे किंवा कला शाखेतील अर्हता प्राप्त शिक्षकांना जाहिराती नुसार एका वेळी उपलब्ध दोन विषयासाठी अर्ज करण्याची सोय करण्याबाबत महासंघाने सविस्तर प्रस्ताव सादर करावा , तो शासनास मंजुरी साठी सादर करण्यात येईल.
७) शाळा सलग्न कनिष्ठ महाविद्यालयासाठी एका तुकडी साठी ६० व वरिष्ठ महाविद्यालय सलग्न कनिष्ठ महाविद्यालयासाठी ८० विद्यार्थी संख्या असावी.
या मागणीसंदर्भात प्रचलित पद्धत व मागणी याचा अभ्यास करून महासंघाने परिपूर्ण प्रस्ताव संचालकांकडे सादर करावा असे निर्देश दिले.
८) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी. या संदर्भात आयुक्त कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले.
९) अंशकालीन शिक्षकांचे मानधन वाढवून मिळावे या मागणीसंदर्भात शासनाने शासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन अंशकालीन शिक्षकांच्या (CHB) मानधनात वाढ केली आहे. त्याप्रमाणे अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
१०) शालार्थ प्रणालीत एकाच वेळी दोन ठिकाणी कार्यरत असलेल्या अर्धवेळ शिक्षकास वेतन मिळण्याची तरतूद असावी.
या मागणीबाबत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. तसेच शालार्थ प्रक्रिया गतिमान केली जाईल असे सांगितले.
११) संचमान्यतेअभावी कायम पूर्णवेळ किंवा अर्धवेळ शिक्षकाचे वेतन थांबवण्यात आले आहे हे निदर्शनास आणून दिले असता
याबाबत माहिती घेऊन वेतन दिले जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
१२) मुंबई विभागातील २०१२-१३ मध्ये नियुक्त शिक्षकांना सप्टेंबर २०१३ ऐवजी २०१२ मधील नियुक्ती दिनांकापासून मान्यता मिळावी अशी मागणी करण्यात आली असता त्यावर वस्तुस्थिती दर्शक अहवाल घेतला जाईल, महासंघाने उचित कागदपत्रांसह या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा असे आवाहन त्यांनी केले.
१३) व्यवसाय तसेच MCVC कडून सामान्य शिक्षण विभागाकडे बदली झालेल्या/करण्यात आलेल्या शिक्षकांना मान्यता देण्याचा निर्णय शासनस्तरावर प्रलंबित असल्याने तेथे पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले.
बैठकीअंती महासंघातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले.
अशी माहिती
महाराष्ट्र स्टेट फेडरेशन ऑफ ज्यू. कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सुनील पूर्णपात्रे सर यांनी दिली .