
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- माध्यमांनी युक्रेनमधील युद्धपरिस्थितीबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी त्यांना आठ दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटची आठवण करून दिली. ज्यावेळी देशात निवडणुका सुरू होतात तेव्हा केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना कशातच रस नसतो, असा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तर प्रदेश आणि इतर निवडणुकांपेक्षा या देशात काहीच महत्त्वाचे वाटत नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
युक्रेनमध्ये आपले विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणा असे ट्वीट करून आठ दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या प्रमुखांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले होते. परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
युक्रेन मध्ये कालपासून युद्ध सुरू झाले आहे. या संकटात विद्यार्थी सापडले आहेत. मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित असते. आज ते असुरक्षित आहेत. याची नोंद केंद्र सरकारने आधीच घ्यायला हवी होती, असे जयंत पाटील म्हणाले.